छबिना

                         छबिना
गावच्या कुलदैवताची वार्षिक यात्रा म्हणजे परंपरागत चालत आलेल्या प्रथांचा सुकाळ असतो, एक मनमोहक आणि प्रेरित आणि रोमांचक असा हा सोहळा असतो यातील एक भाग म्हणजे छबिना.
डिसेंबरमध्ये दत्त जयंती च्या मुहूर्तावर गावचे ज्ञानेश्वरी पारायण सप्ता  चालू  होतो आणि दिंडी सोहळा झाला की 7 दिवसांनी गावची भैरवनाथाची यात्रा चालू होते. या तीन दिवसात पहिल्या दिवशी रात्री देवाची पालखी तामजाय देवीच्या मंदिरातुन दर्शन घेऊन, गावाच्या शिवेवरून महू कुंडीवर पोहचते मग बनातील मंदिरात दर्शन घेऊन वाजत गाजत गावात आणली जाते, रात्री जागरण व गोंधळ कार्यक्रम पहाटे पर्यंत चालतो.

दुसऱ्या दिवशी ताजी यात्रा असते, संध्याकाळी 4 ते 8 मध्ये गावतील तसेच माहेरवाशीण व पाहुणे मंडळी आवर्जून जमा होऊन, बनातील भैरवनाथाचे दर्शन घेतात. बनतील भैरवनाथ म्हणजे गावाच्या वेशीचे रक्षण करणारा गावाचा कुलदेव. या दिवशी त्याचे दर्शनाचे भाविकांमध्ये खूप महत्व असते. दर्शन सोहळा आटपून रात्री  गावातील मंदिरासमोर उभा राहतो तो गावाचा लेझीम खेळ, आणि यापाठोपाठ उभा राहतो तो मन एकाग्र करणारा आणि एक लयीत दुमदुमनारा 100 ढोलांचा आवाजांचा खेळ म्हणजेच छबिना.
छबिण्याची परंपरा कधी पासून चालु झाली याची माहिती उपलब्ध नाही, पण या खेळा मुळे आजूबाजूच्या गावातील लोक रात्रभर एकत्र जमून एक सामूहिक ढोल वाजवण्याचा खेळ खेळत असणार आणि यातून छबिण्याचा उदय झाला असणार.
आजूबाजूच्या गावातील मानाच्या देवाच्या काठ्या देखील येतात आणि जोपर्यंत सर्व मानाच्या काठ्या पोहचत नाहीत तोपर्यंत छबिना उभा राहत नाही.
    छबिन्या मध्ये 50 ते 120 पर्यत ढोल वादक असतात भागातील विविध गावांमधून ते दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. सध्या त्यांना निमंत्रण देऊन बोलवले जाते मोठ्या मैदानात गोल करून किंवा अंडाकृति उभे राहतात. गोलाच्या मध्ये झान्ज घेऊन एक अनुभवी ढोलवादक उभा असतो जो सर्वांना वाजवण्याची दिशा धाकवतो. ढोलयांच्या वाजवण्याचा चढ-उतार ठरवणे याच्या हातात असते. सर्व ढोलयांची नजर याच्यावर व दोन्ही हात ढोलवर असतात.
   रात्री 11 पर्यंत चालू होणारा हा खेळ हळूहळू  लयीत येतो मग एक नादभरा मंत्रमुग्ध करणारा आवाज पूर्ण गावात रात्रभर दुमदुमत राहतो. हा आवाज मनाला सुखावणारा असतो. कधी हळू कधी जोरात कधी वेगात कधी संथपणे ढोलवर पडणारी  दांडकाचा ठोका तर हाताची थाप ऐकायला कान आस लावून राहतात. पहाटे पर्यन्त हा आवाज वातावरणात अश्या प्रकारे वाढत जातो की तो असाच वाजत राहावा व कधी शेवट होऊच नये असे वाटत राहते.

बदलत्या काळानुसार आता ढोल वादकांची संख्या देखील कमी झाली आहे तसेच त्यांना देणारे मानधन परवडत नसल्यामुळे गाव पण ठराविक वादकाना निमंत्रण देते.  यामुळे नवीन तयार होणारे वादकांची संख्या रोडावत आहे, भविष्यात कदाचित या प्रथेलाही फाटा दिला जाईल व हळूहळू बंद पडेल.
सध्या पंचगणी यात्रे चा छबिना सर्वात मोठा असतो व तो पूर्ण रात्र आणि दुसऱ्या दिवशी पण दिवसभर चालत राहतो.
अशी ही सातारा भागातील आगळी वेगळी परंपरा आपण जोपासली पाहिजे. सोबत 2022 च्या छबिना ची व्हिडिओ लििंक देत आहे. https://youtu.be/3Q1EtEFhHiY

 
                         जयंत पांडुरंग जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)