१९९८ पूर्वीची घर..
*१९९८ पूर्वीची घर..* जुनी घर कशी होती ते आपल्या सर्वांना माहीत आहे. दगड मातीच्या 3 रूंद फूट आणि 6फूट उंच भिंती. लाकडी माळा, त्यावर मधोमध घरचा उंचवटा आणि मागे आणि पुढे उतरत कौलारू छत. असच आमचं टुमदार जून घर होत. रस्त्याला लागून, पुढे दोन्ही बाजूला 2 आणि मागे 1,अशा 3 मोठ्या कळकी, त्यात जवळ जवळ प्रत्येकी 300-400 कळक. घर पाच खण रूंद म्हणजे 25 फूट आणि 3 फूट भिंती. लांबी जवळ जवळ 50फूट. पन्नास फुटात गोठा, वटी, मधल घर आणि मागे पडवी होती. मुख्य दरवाजातून आत आले की डावीकडे गोठा, उजवीकडे आंघोळीची मोरी आणि कोंबड्यांचा खुराडा. गोठ्यापासून ओटी 2 फूट उंच होती.ह्या 2 फूट उंचीला चांदवी म्हणत. ती दगडाची होती. त्यावर लाकडाचे पाच खांब होते आणि इथे समजायचे घर पाच खणाचे आहे. ओटीवर वर लाकडी फळ्यांचा माळा होता. ओटीवर दोन्ही कोपऱ्यात 2 दरवाजे होते. त्यातून मधल्या घरात गेले की परत मध्ये भिंत करून मधले घर 2 भगात विभागले होते. त्यामागे पडवी होती. इथे डाव्या कोपऱ्यात चूल आणि भांडी ठेवायची लाकडी मांडणी. त्यावर पितळी तांबे आणि ताट असत. असच मधल्या घरात...