१९९८ पूर्वीची घर..

               *१९९८ पूर्वीची घर..*
जुनी घर कशी होती ते आपल्या सर्वांना माहीत आहे.  दगड मातीच्या 3 रूंद फूट आणि 6फूट उंच भिंती. लाकडी माळा, त्यावर मधोमध घरचा उंचवटा आणि मागे आणि पुढे उतरत कौलारू छत. असच आमचं टुमदार जून घर होत. रस्त्याला लागून, पुढे दोन्ही बाजूला 2 आणि मागे 1,अशा 3 मोठ्या कळकी, त्यात जवळ जवळ प्रत्येकी 300-400 कळक. घर पाच खण रूंद म्हणजे 25 फूट आणि 3 फूट भिंती. लांबी जवळ जवळ 50फूट. पन्नास फुटात गोठा, वटी, मधल घर आणि मागे पडवी होती. मुख्य दरवाजातून आत आले की डावीकडे गोठा, उजवीकडे आंघोळीची मोरी आणि कोंबड्यांचा खुराडा. गोठ्यापासून ओटी 2 फूट उंच होती.ह्या 2 फूट उंचीला चांदवी म्हणत. ती दगडाची होती. त्यावर लाकडाचे पाच खांब होते आणि इथे समजायचे घर पाच खणाचे आहे. ओटीवर वर लाकडी फळ्यांचा माळा होता. ओटीवर दोन्ही  कोपऱ्यात 2 दरवाजे होते. त्यातून मधल्या घरात गेले की परत मध्ये भिंत करून मधले घर 2 भगात विभागले होते. त्यामागे पडवी होती. इथे डाव्या कोपऱ्यात चूल आणि भांडी ठेवायची लाकडी मांडणी. त्यावर पितळी तांबे आणि ताट असत. असच मधल्या घरात मांडण्या होत्या त्यावर धान्याचे डब्बे, पापड, कुरवड्या, शेवया, शेंगाचे पत्र्याचे डब्बे ज्यांना मधोमध गोल झाकण असायचे. मधल्या घरातून पडवीत आणि तिथून मागे पण अंगणात जायला 2 दरवाजे होते. इथे मागे एका कोपऱ्यात अंघोळीच पाणी तापवायला  दगडी चूल होती. त्याच्या बाजूला कळकीला लागून एक मोठा सपाट निमोळता 2बाय3 फुटाचा १ फूट उंच दगड होता त्यावर आम्ही पुरुष मंडळी अंघोळ करायचो. त्याला आम्ही चीप म्हणायचो. त्यावर कपडे देखील धूतली जात. त्यामुळे तो दगड गुळगुळीत झालेला होता. आंघोळीच पाणी मागील बाजूच्या मोकळ्या जागेत आणि कळकीत जायचं. तिथं पपई ची झाड आली होती. तिथेच जळणाचा माच रचलेला असायचा. मागे परड, त्यात खळ, त्या बाजूला बांधावर शेवग्याचे झाड. त्या  बाजूला आणखी एक मोठं उंच झाड होत आणि अजून आहे. त्याच नाव माहीत नाही पण लहान पाणी आम्हाला ते जगातील सर्वात मोठं झाड वाटायचं. तसही  तेव्हा आमचं जग म्हणजे फक्त गाव होत. परड्याच्या शेवटी गार होती. त्या बाजूला गंज आणि शेनीचा माच होता. 
      मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला गोठा, त्यात 1-2 म्हशी किंवा गाई, 2 बैल, रेडक, एखादी शेळी, त्या गोठ्यवार लाकडाचा माळा त्यावर जनावरांची वैरण, त्यावर लाकडाचे जाड जाड आडवे खांब, त्या खांबावर वैरण. उजव्या बाजूला कोपऱ्यात आंघोळीची मोरी, त्याच्या बाजूला दरवाजाकडे बाहेरच्या भिंतीला लागून ठेवलेले कोंबड्यांचे खोरडे, तिथेच कोपऱ्यात जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा लोखंडी टीप किंवा बादल्या. त्या  बाजूच्या माळ्यवर जळण आणि शेणी असायच्या. वटीवर एक लोखंडी खाट असायची. वटीवर २ दिवळी होत्या, त्यावर भिंतीत आडवे घातलेल्या खुट्या  आणि त्या खुट्यत लाकडी शिडी अडकवलेली असायची. वटीवरच्या माळ्यावर जनावरांची वैरण, डाल, शेतीची अवजारे, जुन्या लाकडी पेट्या, दगडी दिवे, अस अनेक साहित्य असायचं. मधल्या घरात टिप.. (हॉटेल मध्ये देतो ती टिप नाही धान्याची टीप..) आणि कणगी असायच्या. इथे जास्त अंधार असायचा. पडवी लांबीला छोटी पण रूंद होती. इथे आमची एकत्र कुटुंबाची पंगत बसायची. 
दिवसभर घरातील मोठी मानस शेतात असायची तेव्हा म्हाताऱ्याआय आमची काळजी घ्यायला,  कोंबड्या संभालायाला असायची. दुपारच्या सर्व आळीच्या कोंबड्या कळकित आराम करायच्या. तेव्हा शांतता असायची आणि चुकून एखादा साप किंवा मुंगूस किंवा बोका कळकित शिरला की कॉक-कॉक करून अख्खी आळी डोक्यावर घ्याच्या. मग सगळ्या म्हाताऱ्या एकमेकींना आवाज देऊन विचारायच्या कोणाची नेली ग.. आणि मग त्या नेणाऱ्या जनावराला शिव्यांची लाखोली वाहिली जायची. 
रात्री मागे खळ्यात आम्ही सगळे मोठ्या अंथरुणात झोपायचो, आणि शेवग्याच्या झाडातून मोकळं आभाळ न्हायळचो. तेव्हा आम्ही मस्ती करत असलो की आई सांगायची आवाज करू नका नाहीतर हाकमारी येईल आणि आवाज देईल. मग जो वो देईल त्याला नेईल. मग घाबरून आम्ही तोंडावर झोपायचो. ते सकाळी जेव्हा कोंबड्या अंथरुणावर शिटा टाकायच्या तेव्हा उठायचो. 

अस आमचं जून घर होत आणि अजूनही ते डोळ्यासमोर तसच दिसत.. अनेकांची जुनी घर अशीच होतीत आणि हा लेख वाचून नक्कीच आठवणीत हरवून जाल यात शंका नाही. आपले प्रतिसाद नक्की द्या 
धन्यवाद
जयंत जगताप 
७७३८०२२३४३. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)