1995 पूर्वीची पवळी

               1995 पूर्वीची पवळी
1995 चा काळ असेल.  पवळी आळी म्हणजे  नळाकडील आळी. गावच्या मुख्य भैरवनाथाच्या मंदिराच्या डाव्या बाजूने सरळ खाली तिरका तीव्र उताराचा रस्ता.भैरवनाथ मंदिराच्या मागे गुरवाचे घर आणि त्याला काटकोनात असलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर.  विठ्ठल मंदिराच्या उजवीकडे आणि भैरवनाथ मंदिराच्या डावीकडे असलेली मोकळी जागा सपाट करण्यासाठी बांधलेल्या ताली म्हणजर त्रिकोणतील कर्ण.   बांधलेल्या 2 ताली आणि त्यांना लागून गेलेला रस्ता म्हणजे पवळी.  भैरवनाथ मंदिराकडून आलेल्या ताली विठ्ठल मंदिरा समोर उंच होत जात.  कारण इथे खोली जास्त असते. पहिली ताल मंदिराकडून खाली जाणाऱ्या रस्त्यावर 5 ते 10 फूट उंच होत जाते. मग त्यावर थोडी जागा सोडून म्हणजे  10 फूट रुंद आणि  70 फूट लांब जागेत आत मध्ये अजून 1 ताल बांधलेली असते.  2 तालीमधील जागेत थोड्या थोड्या अंतरावर 3 पीपर्णी ची झाडे असतात. मंदिराकडून जाताना पाहिले झाड भलं मोठ असते, त्याचा घेर जवळ जवळ 15 फूट गोल असेल. त्याची 1 जाड फांदी 5 फूट उंचीवरून सरळ आडवी झालेली असते आणि त्या तालीवरील जागेत पसरलेली असते. ती अशी पसरलेली असते की वरच्या ताले वरून त्या फांदी ला हात लावत येतो.ती फांदी जवळ जवळ 5 फूट जाड असेल. त्या फांदीत एक छोटं बीळ होत आणि त्यात आत फांदीत बारीक माश्यांच मध पोळ होत. या फांदीच्या गावातील त्या काळातील तरुणांच्या कैक आठवणी असणार यात शंका नाही. बाकी फांद्या त्या पवळीतील रस्त्यावर पसरलेल्या असत. मग पुढे विठ्ठल मंदिरासमोर दुसर पीपर्णीच झाड होते. त्यावर सूर पारंब्या खेळल्या जात. या दोन्ही मध्ये म्हणजे दोन्हीकडून 20 फूट अंतरावर मधोमध आणखी एक छोटी पीपर्णी होती.  अशीच उजव्या बाजूला छोटी ताल तिच्या पुढं  पवारांचं घर. मग त्यापुढे गावचा पिण्याचा पाण्याचा हौद.  त्याला लागून गुरांना प्यायच्या पाण्याची टाकी. त्या पवळीच्या उजव्या बाजूला देखील भलं मोठं पीपर्निच झाड आहे. त्याच्या फांद्या सरळ वर गेलेल्या काही पवळीत आलेल्या आणि काही उजवीकडील बाजूला पवारांच्या पारड्यात उतरलेल्या. आशा या उताराच्या रस्त्यावर खाच खळगे, डाव्याबाजूने तालीला लागून गुरांनी येऊन जाऊन मळलेला रस्ता. त्यात त्यांचा ओला सुखा पव. त्यांच्या खुरानी मातीत मिसळून पव आणि मातीचा एक वेगळा सुगंध यायचा.  दोन्ही बाजूनी पिपरणीची झाडांनी पावळीत रात्री गर्द अंधार असायचा.  तालीला वापरलेले काळे चौकोनी दगड. काही दगड थोडेसे आत बाहेर झाले होते त्यामुळे कधी कधी पवळीतून कधी कधी त्या तालीतील दगडाच्या फटीत हात घालत जसे ट्रेकर किल्ला चढतात तसे ती ताल चढुन आम्ही सरळ वरील मैदानात जायचो.पावसाळ्यात वरच्या आळीपासून येणाऱ्या पावसाच्या लोंढ्याने पवळी लाल पाण्याने न्हाऊन निघायची. पवळीतून खाली गेले की जिथे हौद संपतो त्याच्या डाव्याबाजूला पूर्वी 1 विहीर होती अस सांगतात. त्या विहरीत कोणीतरी पडून मेले होते आणि तिथे चांभारणीच भूत आहे अस म्हाताऱ्याआय सांगायची. रात्रीच गावात जायचं म्हणजे पवळीतून जायला भीती वाटायची. आणि गावातून घरी यायचे असेल तर मंदिरापासून अंधारात जी धूम ठोकायची ते सरळ घरात येऊनच थांबायचो.
       कालांतराने ती विहीर मुजली. 2 ताली काढून त्या जागी सिमेंटची जाड भिंत उभी राहिली. डावीकडील तिन्ही पिपरणी तोडून काढल्या गेल्या. दोन्ही मंदिरामधील जागा त्यामूळे वाढली तिथे आता भव्यदिव्य गावचे सभामंडप उभा राहिला आहे. उजवीकडील पिपर्णी च्या फांद्या छाटल्या गेल्या पण अजून ती समर्थपणे उभी आहे. पवळीतील रस्त्याचं अनेकवेळा काम झाले पण अजूनही खळगे तसेच आहेत आणि अजूनही पवळीतील चढ पहिला घेर टाकल्याशिवाय कोणाला जाऊन देत नाही आणि सर्व गाड्यांचा धूर काढून मंदिरासमोरून हळू हळू जायला भाग पाडतो.
धन्यवाद 
जयंत जगताप
सदर: आठवणी गावच्या....

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)