आजची हिरकणी
आजची हिरकणी- मनोरमा (आराध्यची आई)
हिरकणी ने अंधाऱ्या रात्रीत कड्या कपारीतून खड्या बुरुजावरून उतरत गड उतरून आपल्या लेकराकडे पोहचली होती, फक्त आणि फक्त तिच्या मातृत्व च्या शक्तीमुळे तिला ते शक्य झाले होते, जेव्हा महाराजांना ते समजले व त्यांनी हिरकणीला विनंती केली की परत एकदा उतरून दाखव, म्हणजे आम्हाला समजेल हे तुला कसे शक्य झाले तर तिने महाराजांना मुजरा करून सांगितले महाराज मला हे परत जमणार ही नाही, कारण त्यावेळी मला फक्त माझे बाळ दिसत होते.
अशाच आजच्या काळात ही हिरकणी आहेत. मला अशीच हिरकणी चे मातृत्व दिसते ते माझ्या पत्नीमध्ये.
आजच्या युगात ते कड्या कपारी वेगळ्या आहेत, आव्हान वेगळी आहेत, बाळ सोबत आहे आणि त्याला मोठं करायचे आहे, बळकट करायचे आहे, स्वावलंबी करायचे आहे. त्याचे ध्येय त्याला मिळवून द्यायचे आहे, त्याला जगायला आणि या जगातील वाईट अविचारांंशी लढायला शिकवायचे आहे.
आजची हिरकणीचे काम वेगळे आहे, तिचा संघर्ष मात्र तसाच आहे. मातृत्वात अफाट शक्ती आहे आणि आजही ती तशीच ओसंडून वाहत आहेत. आजच्या युगात चूल आणि मूल ही संस्कृती बदलली आहे पण संपलीही नाहीये आणि मागे ही पडली नाहीये, त्यात आता वाढ झालीये पुरुषांबरोबर उभे राहण्याची, चूल-मूल सोबत कुटुंब पेलण्याची क्षमता सोबत आज तिने ते सोडून स्वताला वाहून घेतलय ते तिच्या लेकारासाठी. स्वतचे काम, करिअर तिने पूर्णतः बाजूला ठेवलय एक उत्तुंग असे शिखर सर करताना अचानक पाय घसरवा आणि खोल दरीत पडत आहे असे वाटत असताना मातृत्वचे पंखानी तिने भरारी घेतली आहे, पाठिवर बाळ आहे पण ते तिला मुलायम रेशमा पेक्षा हलके जाणवत आहे. हिरकनी गड उतरत नाहीये तर यशाचे एक एक शिखर सर करत आहे आणि स्वतःच्या मुलाला एका वेगळ्या उंचीवर पोहचवत आहे.
मी जयंत जगताप आणि माझी हरकणी पत्नी मनोरमा जगताप यांची ही गोष्ट.
मे२०१३ मध्ये आमचा विवाह झाला. मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आणि ती मर्कस् नावाच्या मोठ्या कंपनीत मॅनेजर. दहा जणांची टीम हॅण्डल करणारी आणि सोबत अनेक कल्चर ॲक्टिव्हिटी मध्ये भाग घेणारी. हळू हळू आमचा संसार फुलू लागला आणि 25 नोव्हेंबर 2014 ला आमच्या संसाराच्या वेलीवर फुल फुललं. आराध्य चा जन्म झाला. जन्म व्यवस्थित झाला, चौथ्या दिवशी डिस्चार्ज घेताना अचानक त्याला आखडी आली. दहा दिवस nicu मध्ये ठेऊन आरध्यल घरी आणले. त्याची वाढ हळू हळू होत होती हे मनोरमा ने ओळखले आणि विविध फिजियोथेरपी उपचार घेत त्याला बसवणे, रांगणे, उभ रहाणे शिकवले. 2 वर्षाचा होता होता आम्हाला समजले की त्याची बुद्धीची वाढ हळू होत आहे आणि त्याला ऑटीझम चे लक्षण आहेत. आम्ही दोघेही आतून तुटलो होतो. अनेक डॉक्टर कडे धावपळ चालू केली. ओटी, स्पीच थेरपी, स्पोर्ट्स थेरपी, औषधे असे अनेक उपचार चालू केले.
सर्वात मोठा त्याग म्हणजे एका ओटी डॉक्टरने मनोरमा ला सांगितले की तुम्हाला नोकरी सोडून 100%त्याला बघावे लागेल कारण आईकडून अशी मुलं जास्त वेगात शिकतात. त्या वेळेस मनोरमा करिअरच्या उंच ठिकाणी होती, बिझनेस analyst म्हणून तिला नुकतच प्रमोशन भेटल होत. 70हजार पगार चालू झाला होता. अस सर्व असताना एक क्षणाचा ही विलंब न करता मनोरमाने मुलासाठी नोकरी त्यागली. कोणताही विचार केला नाही.
त्यानंतर जस doctor सांगतील तस आराध्य चे ओटी, स्पीच थेरपी चालू केले. त्यासाठी कोपरखैरणे वरून खारघर, ऐरोली, टिळकनगर, असा खडतर प्रवास चालू होता. कधी रिक्षा, कधी ट्रेन, कधी टॅक्सी, अनेक वेळा रिक्षा भेटली नाही की आरध्यला कडेवर घेऊन एक एक किलोमीटर चालणे. अशी कसरत मनोरमाची चालू होती. टिळकनगर मध्ये एक नवीन ऑटीझम इन्स्टिट्यूट चालू झाले होते. तिथे कोपरखैरणे वरून जायला 2 ट्रेन बदलावे लागत आणि 2 रिक्षा करव्या लागत. वर्षभर ती कसरत केली. शेवटी स्वतचं राहत घर सोडून आम्ही त्या इन्स्टिट्यूटसाठी घाटकोपर ला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. 2019 मध्ये आम्ही घाटकोपरला गेलो. वर्षभर तिथे राहून टिळकनगरला जात होतो. तिथे ही सेंट्रल लाईन मग हार्भर असा उलटा प्रवास करावा लागत असे. अस करत असताना मध्येच ज्या ओटी डॉक्टर ने आम्हाला ते इन्स्टिट्यूट जॉईन करायला सांगितले होते तिनेच ते सोडले. नंतर आम्हाला समजले तिथे आमची फसवणूक होत होती. भरलेले पैसे बुडाले, घर सोडून इतक्या दूर आलो होतो ती सर्व मेहनत वाया गेली. आता परत आरध्य साठी नवीन ओटी आणि स्पिच डॉक्टर शोधायचं होत. मनोरमा ने घाटकोपर मध्येच श्रुती नावाची एक डॉक्टर शोधली. तिने आराध्य ला छान ग्रूम केलं. सहा महिने तिच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यावर तिने आराध्यला शाळेत घालायला सांगितले. मग शाळा शोध चालू झाला. ते करताना वाशी मधील sunshine शाळा माहीत झाली. मग तिथे admission घेतले. आणि पुन्हा सर्व संसार उचलून वाशी मध्ये राहायला आलो.
सहा महिने शाळा झाली आणि कोरोना आला. तसच सर्व टाकून आराध्यला घेऊन गावी गेलो. कारण या भयानक आजाराच्या साथीत तो सुरक्षित राहणे गरजेच होत आणि आम्ही सुद्धा.
गावी पण गेल्यावर त्याची ऑनलाईन शाळा चालू होती रोज उन्हात दुपारी मेहनत करत मनोरमा त्याची मोबाईल वरून टीचर सांगितलं त्या ॲक्टिव्हिटी करून घेत होती आणि त्याला develop करत होती. पावसाळ्यात गावी रेंज नसायची, मुसळधार पाऊस असायचा त्यात देखील तिने हार न मानता, नवीन नवीन जागा शोधत त्याची शाळा चालू ठेवली होती. 6 महिने असा खडतर शाळा करत शेवटी सप्टेंबर 2020 मध्ये मुंबईला परत आलो. वाशी मधील घर पालिकेच्या हॉस्पिटल जवळ होत, अजूनही कोरोना जोर धरून होता, मग आम्ही निर्णय घेतला पुन्हा घर बदलायच. परत आम्ही कोपरखैरणे मध्ये पण दुसऱ्या ठिकाणी भाड्याने घर घतले आणि तिथे रहायला आलो. इथून शाळा दूर होती, शाळेची व्ह्यान आहे पण त्यात सुरक्षितता दिसत नव्हती म्हणून मग मनोरमा ने स्वतः रिक्षा ने रोज आराध्य ला शाळेत सोडायचे आणि आणायचे ठरवले.
या सर्व वरील काळात माझी नोकरी बाहेर फिरायची होती. मी आठवडा आठवडा बाहेर असायचो तेव्हा एकटी मनोरमा हे सर्व अवघड काम पार पाडत होती. घर, स्वयंपाक, आराध्य ची आंघोळ त्याला भरवणे, औषधे देणे, त्याचे व्यायाम घेणे, ओटी, स्पीच साठी अनेक ठीकाणी घेऊन जाणे, त्यात कधी तो चिडणार, अनेक वेळा रडणार, सार्वजनिक ठिकाणी अंग टाकून देणार, त्यात बघणारे विविध प्रश्न विचारून भांबावून सोडणार. अशी खडतर वाटचाल करत आज तिने आराध्यला एका वेगळ्या उंचीवर घेऊन आली आहे.
समाजाची आव्हान आहेत आणि ती ते दुप्पट ताकतीने पेलत आहे. तिचा मातृत्व चा झरा वाहतोय आणि तिचे लेकरु त्या अमृताचा आस्वाद घेतय, तिच्या प्रेमाच्या डोहात ते लेकरू स्वछंद पोहतय... तरंगतय.... अशा या हिरकाणीला मानाचा मुजरा.
धन्यवाद
जयंत जगताप (आराध्यचे बाबा)
Comments
Post a Comment