पेरणीच्या काळ
पेरणीच्या हंगाम
ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देई ज्ञान, ज्ञानदेव प्रमाण.. निवृत्ती देई ज्ञान... निवृत्ती देई ज्ञान... आषाढी सप्ताह चा आज प्रारंभ झाला, यानिमित्त गावात अतिषय भावमय असे भजन झाले, खूप दिवस झाले खूप काही लिहायचे बाकी राहिलंय, आज वरील अभंग ऐकला आणि मन प्रसन्न झाले. 28 वर्ष नंतर पहिल्यांदा असे वातावरण अनुभवत आहे. कोरोना चा कहर चालूच आहे, पण आता तो विषय जुना झालाय, शेतकरी जोमाने कामाला लागला आहे, जुन च्या पहिल्या आठवड्यातच जोमदार पाऊस पडला, जमिनीला घात आला, बैलांचा आराम संपला, पाबार शेतात फिरू लागली, औती शेता-शेतात फिरू लागली, सारंग, सुंदर, नाजूक,हिरा,पोपट, राजा, सर्जा नावाचे आवाज शिवारात घुमू लागले, माती खालीवर होऊ लागली तसा तीचा सुगंध, दरवळू लागला, सोबत बैलांचा शेणाचा एक वेगळाच वास पाबरीमागे, कुळवणीमागे येत असतो तो कुठेच परत अनुभवायला मिळत नाही, जमिनीतील किडे वर येऊ लागले त्यांना खायला सीझन चालू झाला आणि वावरत कुंपण पडू लागलीत, बांध वरील पावसाळी रस्ते पुम्हा एकदा मळू लागले, चपला घरात राहू लागल्या आणि पाय चिखल तुडवू लागले.
हाच तो काळ जो शहरातील चाकरमानी कधीच अनुभवत नाही, शाळकरी मुले कधी बघत नाहीत,ते या वर्षी धाकवले.
पेरणी संपली की त्यामागे मनंदयाला बैल थकू नयेत म्हणून, औती स्वतः मंदत होते, अशी मेहनत करून शेतकरी या धरणीला फुलवत आहे.
पेरणी संपली आणि एक आठवड्यात नवीन जीवन फुलू लागले, कोम वर येऊ लागले, तसे शेतकऱ्यांचा चेहरा फुलू लागला, डुक्कर, मोर, पक्षी यांच्याकडून पिके वाचवायची कसरत चालू झाली. बैल पुन्हा आराम करू लागलीत आता तोंडाला मुस्के बांधून बाहेर पडणार ते सरळ भात लावणीला चिखल करायला.
आता कुळपनी, डुबायचे काम जोमात आहे. कांद्याचे बियांचे पैसे आलेत आणि गावात आनंद असा आला आहे की कोरोना कधी नव्हताच असे वातावरण झाले आहे.
भैरवनाथ मंदिराला रंग देण्याचे काम उद्या चालू होईल आणि पुन्हा एकदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.. अशा भक्तिमय वातावरणात गाव दुमदुमन जाईल.
जयंत जगताप
Comments
Post a Comment