दोस्ती
दोस्ती
दिवस 1-
गेल्यावर्षी मे 2020 मध्ये लोकडोवन मध्ये गावी राहिलो होतो. असच एक दिवस खास मित्रासोबत डीपी (गावाबाहेरील ट्रान्सफॉर्मर हाऊस जे dp नावाने प्रसिद्ध आहे.) च्या खालून शिंदेच्या घराकडून गळत्याच्या रस्त्यावर चाललो होतो. समोरून गावातील काही ओळखीचे तरुण आले.ते अनेक मव्ह (मध) काढून आले होते. मधाची भरलेली किटली घेऊन एक जण समोर आला. मध अतिशय औषधी असते आणी ते असे भेसळमुक्त असेल तर खूपच भारी. मी सहज विचारले अरे मध मिळेल का औषधासाठी.
किटली वाला संकोचला. तो नाही पण म्हणू शकत नव्हता, त्याने पुढच्या वर ढकलले. आम्ही जे समजायचे ते समजले आणि पुढे निघून गेलो.
दिवस 2-
लोकडोवन चालू होते आणि रिमोट लोकेशन वरून म्हणजे गावी विठ्ठल रुखमाई मंदिरात बसून काम चालू होते. आज दिवस खूप व्यस्त होता. संध्याकाळच्या 4 वाजले होते. काम चालू होते आणि मित्राचा फोन आला. "जय कुठे आहेस" म्हटले "कामात आहे", समोरून हक्काचा आवाज आला "काम सोड आणि घरी ये" आपल्याला बाहेर जायचय.
मी कसतरी काम आटपून निघालो. घरी पोहचलो तर हा एक विळा, मोठी दोरी, एक पातेलं, 2 टॉवेल घेऊन तयार होता.
मी म्हटलं हे काय? "तुला मध हवी आहे ना? तू मागितलीस आणि तुला मिळाली नाही, मी असताना कशी नाही मिळणार? आज आपण अनेक मव्ह काढायची आणि सर्व मध तू घरी न्यायची. दोघे गालात हसलो आणी निघालो.
गावाखालील त्यांच्या वावरात एक कळक ठेवला होता, त्याला तो विळा त्या दोरीने करकचून बांधला, ओढून बघितला. कळक आणि विळा आपले काम करायला सज्ज झाला. मी म्हटले अरे पण काल तर त्यांनी सर्व मव्ह काढलीत मग आता कुठे जायचे. तो म्हटला तिकडेच जायच, त्यांची पोहच जिथे नाही तिथे आपण पोहचायचे. मला समजले नाही पण मित्रावर पूर्ण विश्वास ठेवला आणि निघालो. करहर-पंचगणी रस्ता ओलांडला आणि गळत्याच्या रस्त्यावर लागताच डावीकडे वावरत वळलो. समोर 50 मीटर वर 2 बाभळीची झाड होती. याने 50 मीटर वरूनच ता बाभळीच्या शेंडयत मव्ह हेरलं. आता तो सांगू लागला, काल यांनी बाभळीवरची मव्ह काढली नसणार. आपण फक्त बाभळी बघायच्या आणि मव्ह शोधायची. व्वा.. मी आश्चर्यकारक नजरेने त्याच्याकडे बघितले. आता आम्ही बाभळी खाली पोहचलो. कळक मव्हा पर्यंत पोचतोय का याचा तो अंदाज घेऊ लागला. कळक थोडा छोटा पडत होता. मग त्याने खोडात चढायचे ठरवले. खोडात चडून तो कळक मव्हा पर्यंत पोहचवणार आणि मव्हाची फांदी विल्याने ओढून कापणार. माझे काम होते खाली उभे राहून पडणारी मव्हाची फांदी टॉवेल मध्ये कॅचं करायची आणि माशा चावायचा अगोदर मव्ह घेऊन दूर पळायचे.
प्रतिक्षा संपली आणि आम्ही कामाला लागलो, त्याने फांदी जोरात ओढली आणि तोडली, अर्ध्यात खाली आली आणि एक फांदीत अडकली. पण माशांचा घोळका सरळ खाली पडला, माझ्या अंगावर माशा आल्या आणि 2-3 माशा चावल्या. मित्र अजूनही खोडात उभा होता आणि ती फांदी खाली पाडत होता, आणि पाडुनच खाली उतरला. पाहिले महु निघाले, माशा चावल्या, महू फुटले होते पण सुरवात झाली. मग असेच 2 मग 3 महू काढलीत. पहिल्यापेक्षा कमी चुका आणि लवकर. थोडयाच वेळात गणेश आम्हाला येऊन मिळाला, तो आम्हाला गावात शोधतच होता.
दोघांना तिघे झालो आणि 2 तासात 10 महू काढलीत आणि सर्व बाभळ नि बोरीच्या झाडावरची.
सूर्य मावळत्या डोंगरा मागे गेला होता नि अंधुक होत होते. आता आम्ही टोम्पेवाडी ला गळत्यावरून जाणाऱ्या नदीतील रस्त्यावर पोहचलो होतो. नदी पलीकडे टोम्पेवाडी हद्दीत एक ओढा नदीला येऊन मिळतो त्या ठिकाणी खूप झाडी होती. ओढा उंचावर होता आणि नदी खाली होती. त्या झाडीत काही काटेरी झाडे होती, तिथे मव्ह असणार अशी मित्राला खात्री होती. अंधार पडत होता, पण हे शेवटचे मव्ह काढून परत फिरू असे ठरवून आम्ही नदी ओलांडली. (नदी ओलांडत असताना गणेश ने हा सुंदर फोटो काढला.
नदी ओलांडुन पलीकडे चढ चढुन ओढायतील झाडीत गेलो. अंदाज सत्यात उतरला. एका ऐरण( या झाडावर चढता येत नाही साल गुळगुळीत असते.) वर शेंड्यात भले मोठे मव्ह होते. मध्ये खूप झाडी होती आणि कळक ही छोटा पडत होता. मित्राने कसातरी कळक झाडीतून वर पोहचवला.
मव्ह अजूनही 2 हातभार दूर होते. मग गणेश आणि मी दहीहंडी ला उभे राहतो तसे उभे राहिलो, तो आमच्या मांडीवर पाय देऊन खंडायवर चढला आणि मव्हाची फांदी जोरात ओढली. फांदी तुटली पण झाडीत अडकली. पण माशा सतर्क झाल्या आणि डोकॅवर घोंगाऊ लागल्या. अंधार पडत होता, दाट झाडीत तो अंधार जास्तच जाणवत होता. आमचे पाय खाली वेलीत अडकले होते. एक बाजूला नदी, आम्ही अर्धे ओढ्यात आणि अर्धे बांधावर उभे होतो. त्या घनदाट झाडीत समोर धबधबा च्या खडक होता. तो कातळ आता आम्हाला गूढ भासू लागला. आम्ही तिघांनी एक मेकांकडे बघितले आणि तिथून निघायचे ठरवले. कळक कसातरी खाली घेतला, मव्ह तसेच सोडले, डोकॅवर माशा घोंगावत होत्या, जमिनीला चिकटून कसे तरी तिथून बाहेर पडलो, कळक, मधाचे टोप, आणि टॉवेल गुंडाळून पळतच नदी ओलांडली.
मला मध मिळावी म्हणून मित्राने हे सर्व कष्ट घेतले होते. काल मला त्यांनी नाही म्हटले आणि मला ही काही वाटले नाही, पण मित्राला ते लागले होते. मी असताना माझ्या मित्राला मध नाही भेटली हे त्याला लागले होते. त्याचे कसब त्याने आज पणाला लावले आणि 11 मव्ह मला एकट्याला दिलीत. सोबत गणेश ने तोडीस तोड साथ दिली.
तो माझा बालपणापासून चा मित्र म्हणजे सुजित गोळे.
Comments
Post a Comment