गोपालकृष्ण मंदिर कोची
मागील आठवड्यात बीबीसी मराठीवर एक व्हिडिओ बघितला आणि समजले की कोची मध्ये एक पुरातन मंदिर आहे. अशी तर अनेक मंदिरे आहेत पण या मंदिराची देखभाल बघणारे आणि हे मंदिर स्थापन केले ते सर्व मराठी कुटुंब आहेत.
30 एप्रिल ला मला कामानिमित्त कोची ला जायचे होते, तेव्हा या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायाचे आणि या मराठी बांधवाना नक्की भेटायचे हे ठरवले. आज मंगळवारी 30 एप्रिल ला मंदिरात पोहचलो,
आज कामानिमित्त कोची मध्ये आलो. जसे काम संपले, लॅपटॉप ची बॅग हॉटेल वर टाकून, टॅक्सी केली आणि सरळ गोपालकृष्ण मंदिर, पंडियन रोड वर गेलो.
प्रवेशद्वारातून आत जाताच छत्रपती शिवाजी महाराज सभागृह असा फलक दिसला आणि पुढची सर्व पावले अभिमानात कशी पडली ते समजलेच नाही.
मंदिरात पुजारी दिसले, त्यांच्याशी सरळ मराठीत बोललो आणि समोरून मराठीत प्रतिसाद आला. ते आहेत सप्रे गुरुजी. मंदिर चा इतिहास त्यांनी सांगितला. 1809 साली जीर्णोद्धार झाला,म्हणजे मंदिर जुने आहे अगदी पुरातन ढाचा आहे, कौलारू छत, चारीबाजुनी भिंती आणि मध्ये मोकळी जागा आहे. 1809 पासून मराठी, गुजराती समाज या मंदिराचे संरक्षण आणि देखभाल करत असतो.
सप्रे, गोखले, तेमबालकर, देव, वामन, अशी मराठी गुजराती 25 ते 30 कुटुंब हे मंदिर ची देखभाल करत आहेत.
मंदिरात गेलो तेव्हा लाऊड स्पिकर वर आकाशी झेप घे रे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा हे भावगीत वाजत होते.
काही वयस्कर मराठी भाविक भेटले, भरपूर गप्पा मारल्या. त्यांचे तोंडभरून कौतुक केले, माझी विचारपूस केली. 1 तास गप्पा मध्ये वेळ कसा गेला कळेलच नाही. 7 वाजता आरती ची वेळ झाली, आरती केली आणि जडपावलाने सर्वांचा निरोप घेतला.
कोचीत आलात तर नक्क्की या मंदिराला भेट द्या आपले मराठी बांधव आपल्याशी बोलायला आसुसलेले असतात. एक कौतुकाची थाप या धर्मरक्षकांवर पडलीच पाहिजे.
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment