महू कुंडी
महूकुंडी
गावाबद्दल लिहिलं तेवढं कमीच असत. कारण प्रत्येक दिवस हा एक आठवणींचा असतो. शेती डोंगर आणि नदी हे ज्या गावाला लाभले ते गाव स्वर्ग असते.असाच आमच्या गावच्या नदीवरील पाण्याचा डोह ज्याला महू कुंडी या नावाने ओळखले जाते. करहर पांचगणी ला जोडणाऱ्या रस्त्याचा पूल, त्याखाली खडकाळ पात्र ज्यावर गावातील महिला कपडे धुतात, उन्हाळ्यात इथे पूर्ण गावच्या वाकळा धुतल्या जातात आणि वर पुलावर सुकवल्या जातात. त्याखाली पाण्याचा डोह, दोन्ही बाजूनी खडकाने वेढलेल नदीच पात्र, एक छोटासा धबधबा, त्या बाजूला तयार झालेली खडकाची खंदक ज्याला भोवरी म्हटले जाते.त्या खडकावर गावची कुलदेवीच छोट मंदिर. दसरा आणि यात्रे ची पालखी तामजय वरून शिवे मार्गे सर्वप्रथम या देवीला भेटायला येते मगच गावात जाते. पुलावरून येताजाता गावकरी त्या देवीला नमस्कार करतात किंवा गाडी चालवणारे गाडीचा हॉर्न वाजवून मानवंदना देतात. डोह पुढे जाऊन रुंद आणि खोलीला कमी होत जातो, त्याखाली स्मशानभूमी. त्याखालोखाल एक नैसर्गिक पाण्याचा झरा आहे ज्याला काळसरी म्हटले जाते.
अशा या महू कुंडीवर जुन्याकाळी देवीचं सण असला की जेवणाची भांडी देखील वर यायची अशी दंत कथा ऐकायला मिळते.
या कुंडीवर गणपती विसर्जन होत असते. गावातील गुरे पाणी प्यायला, बैल गाई म्हशी धुवायला आणली जातात.
लहान मुले पोहायला शिकायला या डोहात येत असतात. लहानपणी आम्ही आई बरोबर नदीवर गेलो की आई कपडे धुवेपर्यंत या डोहात आम्ही मनोसक्त खेळायचो. गुर धुताना म्हशींची शिंगे दाबून त्यांचे तोंड धुवायला एक वेगळी मज्जा यायची.
अशी ही महू कुंडी मनात नेहमी एक वेगळी आठवण देऊन जाते.
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment