मी पाहिलेला पहिला सिनेमा

                     मी पाहिलेला पहिला सिनेमा
1980 ते 2000 चा काळ जो तंत्रज्ञान परिवर्तनाचा काळ होता तेव्हा गावाकडं  tv वैगरे प्रकार नव्हते, फक्त रेडिओ आणि टेप रेकॉर्डर वर ऐकून मनोरंजन व्हायचं.  सिनेमा बघायला जायचं म्हणजे एक उत्सव असायचा. सिनेमागृह ठराविक शहरात असायची. दळणवळनाची साधन खूप कमी अगदी नासल्यागतच. तेव्हा वडाप ला 407 टेम्पो चालायचे. मागे फाळका खाली पडलेला असायचा. वरती छताला एक जाड कासरा बांधलेला असायचा. त्याला पकडून कसरत करत टेम्पोत चढायचे. आम्हाला तर सरळ उचलून आत फेकले जायचे. बाई माणसाना चढायला उतरायला अवघड जायचं. असो.. विषयाकडे वळू. 
 तर तेव्हा सिनेमा बघायला जायचं म्हणजे तो सिनेमा प्रसिद्ध झाला असेल तर गावातील माणसं एखादा टेम्पो ठरवून बायका पोर घेऊन शहरात जात आणि सिनेमा बघून परत गावात आणून सोडत असत. 
मला आठवत तेव्हा माहेरची साडी हा सिनेमा खूप प्रसिद्ध झाला होता. गावा गावात त्याची चर्चा सुरू होती. बायकांमध्ये विशेष आकर्षण होत. जी बघून आली होती ती परत जायला उत्सुक असायची. तेव्हा हे टेम्पो वाले रोज गावातून 1 तरी टोळक सिनेमाला घेऊन जात होत. प्रत्येक जण आपला नंबर कधी लागेलं ह्याची वाट बगत असे. असच आमचा नंबर आला. आमचा म्हणजे आई, आत्या, मावश्या, चुलत्या आणि आम्ही लहान लहान पोर. जी कळती होती ती घरी ठेवली जायची. पण मी खूप मस्तीखोर होतो, आई शिवाय कोणाला ऐकायचो नाही आणि मला दुसऱ्या कोणी मारलेल आई ला खपायच नाही. मग जिकडे आई जाईल तिकडे मला सोबत घेऊन जायची. तर आम्हला त्या टेम्पोत घालून वाई ला घेऊन गेले.  तिथे मोठं पत्र्याचा शेड असलेला हॉल होता, त्यात आम्ही गेलो.आणि मोठया पडद्यावर माहेरची साडी हा सिनेमा चालू झाला.  मी 6-7 वर्षाचा असेन मला काही कळत नव्हतं, मधेच मी झोपलो असेन, आणि जेव्हा उठलो तेव्हा त्या पडदयावर एक बाई सारखी रडत होती आणि 1 म्हातारी सारखी ओरडत होती. आणि इकडे सगळ्या बायका मुसमुसुन रडून त्या म्हातारीला शिव्या शाप देत होत्या. म्हाताऱ्या बायका तर गावठी शिव्या देत होत्या.  थोड्या वेळात त्या हॉल मध्ये light चालू झाल्या आणि डोळे पुसत आमच्या सगळ बायका मंडळ टेम्पोत बसलं. घरी येई पर्यंत त्या सिनेमातल्या म्हातारीला शिव्या आणि त्या चितेवर झोपलेल्या बाई ला सहानभूती देत होत्या. मला काही कळत नव्हतं पण टेम्पो ची सफर ची मज्जा आली होती. तर हा माझा पहिला सिनेमा जो मला कळला नव्हता पण मोठा झाल्यावर बघून समजला. 

जयंत जगताप
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)