चिलबल - आनंद पवार
चिलबल -अभिप्राय
ज्याला जो छंद त्याला तशी माणसं भेटत जातात. सोशल मीडिया वर विशेषताह फेसबुक वर अनेक विषयांवर अवांतर वाचन करायला मिळते. असेच गेल्यावर्षी फेसबुक सातारा समूहावर आनंद पवार यांच्या चिलबल या पुस्तकाविषयी वाचायला भेटले. तसा मी हाडाचा वाचक, जे भेटेल ते वाचायचा प्रयत्न करत असतो. अनेक कादंबऱ्या, इतिहास वाचन, सावरकर, ज्योतिबा फुले यांचं लेखन वाचून झाले. मग अण्णाभाऊ साठे यांची "कृष्णाकाठच्या कथा" ही त्यांची अनुभवाची शिदोरी वाचली आणि मी ही लिहायला लागलो.हळू हळू रवी गावडे हे आमच्या भागातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व ओळखीचे झाले. त्यांचे फेसबुक वॉल वरील लेखन वाचून प्रगल्भ होत होतो, त्यांचे नकळत मार्गदर्शन भेटले आणि नवीन लेखक मित्र भेटत गेले. आनंद पवार ही त्यातील एक.
अगोदर चिलबल नाव वाचून मला याचा अर्थ कळला नाही. मला वाटले ते चिलबिल असेल. पण त्यातील एक प्रकरण खळ वाचलं आणि जाणवलं हे वेगळंच काहीतरी आहे.
लगेच त्यांना फोन केला आणि पुस्तक कसे भेटेल याची चौकशी केली. पहिल्या कॉल वरच आमच्यात अशी चर्चा झाली कि जणू काही आम्ही जुने मित्र आहोत.
पुस्तक मागवले, त्यांनी फक्त पुस्तकाचे पैसे घेतले आणि स्वखर्चाने पोस्टाने पाठवून दिले.
हातात येताच त्यातील त्यांचं मनोगत वाचूनच मी भारावून गेलो. एक-एक प्रकरण म्हणजे त्या काळात आपण जाऊन जगतोय असा भास होतो. कादंबऱ्या उत्कंठा वाढवतात आणि आपण भराभर वाचून संपवतो. पण चिलबल म्हणजे वाचून संपवण्यासाठी नाही आहे. निवांत एक-एक धडा वाचत अनुभवण्यासाठी आहे.
माझ काम फिरतीच आहे, महिन्यात पाच -सहा वेळा विमान प्रवास होतो. विमानात शांतता असते. तेव्हा आपण हे पुस्तक वाचत प्रत्येक प्रवासात एक प्रकरण वाचून अनुभवायचं अस ठरवलं. अस करत गेल्या एक वर्षात हे मी अनुभवलंय. मध्ये एकदा ते विमानात विसरून राहिले सुद्धा. ते गेले भुवनेश्वरला. मग सर्व प्रोसेस करून ते मिळवले(त्यावर मागे लिहले होते).
तर हे चिलबल आपल्याला जगण्याची उमेद देते, भरारी घेण्यासाठी लागणारी मेहनत काय असते ते दाखवते. सत्तर-ऐंशी चा काळ कसा होता हे अनुभवायला मिळते.
हे मी वाचून वडिलांना ऐकवले आणि त्यांनाही त्यांचे जुने दिवस भरभर डोळ्यासमोरून गेले.
प्रत्येक वाचकाने वाचावे आणि आणि वडील धाऱ्यांना ऎकवूंन त्यांचा भूतकाळ पुन्हा अनुभवयास द्यावा अस हे चिलबल आहे.
धन्यवाद आनंद पवार दादा..
Comments
Post a Comment