दसरा

     *महूचा दसरा*
दसरा म्हणजे हिंदी मध्ये दश-हरा याच्या दोन कथा सांगितल्या जातात. पहिली म्हणजे या दिवशी रामाने रावणाला ठार केले आणि सीतेला मुक्त करून लंकेतून परत आणले आणि दुसरी म्हणजे याच दिवशी बारा वर्षे वनवास संपवूंन पांडवांनी आपल्या खऱ्या रुपात येत शमीच्या झाडावरून आपली शस्त्र बाहेर काढलीत आणि महाभारताच्या अंतिम पर्वास सुरवात केली. 
  जसा दिवाळी हा घरोघरी साजरा होणारा परंतू आपापला सण तसा दसरा हा सर्वांच्या सहकार्यातून एकत्रितरित्या साजरा होणारा सण. 
महू गावात दसरा सण साजरा होतो तो आगळ्यावेगळ्या पद्धतीने. घटस्थापनेला घट बसवले जातात आणि रोज 1 माळ चढवली जाते. अस 10 दिवस रोज संध्याकाळी आरती केली जाते. खरा जोरदार दसरा असतो तो दहाव्या दिवशी.  देवाची पालखी काढली जाते, ती स्वच्छ करून सजवली जाते, फुलांनी तिची आरास केली जाते. सोबत देवाची काठी म्हणजे लांब मोठा रंगीबेरंगी कापड बांधलेला कळक असतो. सोबत देवाची छत्री असते. ही सर्व तयारी झाली की दुपारी साडेतीन ला पालखीचे प्रस्थान होते ते बिरामनेवाडीच्या तामजाय देवीच्या मंदिरात. परंपरे नुसार भैरवनाथ तिच्या बहिणीला भेटायला तामजय देवीकडे जातो. पालखी चा मार्ग हा सरळ रस्त्यावरून नसून परंपरे ने चालत आलेला वावरा-वावरातून बांधावरून आहे. महू च्या शिवेवर पालखी थांबवून एका ठिकाणी नेहमी च्या वावरात देवाची आरती होते. मग पालखी पळवत पळवत पवारवाडी वरून बिरमाणेवाडीच्या तामजय देवीच्या मंदिरात पोहचते. महू, पिंपळी आणि खर्शी च्या पालख्या येतात.तिन्ही गावचे ग्रामस्थ एकत्र आरती करतात, लेझीम चा डाव खेळतात एकमेकांना सोन देतात आणि चांगभलं बोला चांगभलं असा जोरदार गर्जना देत सोनं लुटायचा कार्यक्रम पार पाडतात. बिरमाणे वाडीचे ग्रामस्थ पालखी स्वतः उचलून त्यांच्या शिवेपर्यंत आणून देतात ही परंपरा आहे. यातून तिन्ही गावात एक आगळंवेगळं स्नेहाच नात तयार झालं आहे. 
  तिथला पारंपरिक कार्यक्रम झाला की पालखी माघारी निघते ते शिवेवरून सायवन, म्होरला आरा मधून चावरातून मार्गाने आणि जाते ती नदीवर. नदीवर कोंडजाई देवीची भेट घेऊन, तिथे आरती करून पालखी  पोहचते बनातल्या मंदिरात. हे महू गावचे पाहिले, जुने पुरातन भैरवनाथाचे मंदिर आहे. कोणताही कार्यक्रम हा बनात दर्शन घेऊनच पूर्ण होतो. बनात आणि तिथेच 100 फुटावर असलेलं महादेवाची पिंड तिथे पालखी नेऊन मग वाजत गाजत तिचे प्रस्थान होते ते महू च्या शिवारात. अतिशय भक्तिमय अशा वातावरणात पालखी गावात आणली जाते. खालची आळी ते वरची आळी अस सर्व महिला पूजन करत, पालखी ओवळत पुढे सरकते. मंदिरासमोर ढोलचा मोठा डाव खेळला जातो. या सर्व कार्यक्रमात रात्री चे नऊ-साडेनऊ वाजलेले असतात. मग पालखी मंदिरात उतरवली जाते. मंदिरासमोर  पंटागणात सर्व मोठा गोल करून उभे राहतात, एकसाथ राष्ट्रगाण वंदे मातरम गातात. त्यानंतर सर्व जण *चांगभलं बोला..... चांगभलं* चा घोष देतात. एकामागोमाग एक असे पंधरा वीस वेळा वेगवेगळे व्यक्ती हा घोष करतात आणि त्यांच्या मागे सर्वजण चांगभलं... असा सूर देतात. 
   शेवटी सर्वजण जागेवर उभे राहून पुढे सोनं वाहतात म्हणजे सर्वाने दिले याचे ते प्रतीक असते. त्यानंतर एकमेकांना भेटून रामराम केला जातो. हे सर्व होत असताना एक मंतरलेल वातावरण तयार झालेलं असत. यावर्षी मोठ्या संख्येने गावकरी विशेषतः सर्व मोकाशी भावकी उपस्थित होती त्यामुळे एक आगाळ वेगळं स्वरूप या सणाला आले होते. अशा प्रकारे हा सोनं लुटायचा दसरा सण आनंदात संपन्न होतो. सरते शेवटी सर्वजण गावात आपापल्या नातेवाईक, मित्र आणि आळीतील शेजाऱ्यांकडे जाऊन महिलांना सोन देणं घेणं आणि पुरुषांना रामराम करून हा सण पूर्णत्वास जातो. आणि दसरा आपला आनंद देऊन जातो.
धन्यवाद
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)