मंदिर उद्घाटन सोहळा दिवस पहिला भव्य मिरवणूक

 *मंदिर उद्घाटन सोहळा दिवस पहिला - भव्य मिरवणूक*
गेले १ वर्ष ज्या दिवसाची संपूर्ण गाव वाट पाहत होता तो दिवस ठरला होता.. महू गावच्या काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडणार होता २५ ते २७ डिसेंबर २०२३ ला. 
 जशी २५ तारीख जवळ येऊ लागली मुंबईकर, पुणेकर आणि अगदी आफ्रिकेवरून गाववाले गावाकडे पोहचले होते. ख्रिसमस च्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या त्यामुळे मुंबई-पुणे रस्ते तुडुंब गर्दीने भरले होते. 5 तास ऐवजी 8-9 तास प्रवास करून भाविक गावी पोहचत होते. 
  गावच्या लोकांनी नियोजन खूप जबरदस्त केले होते. अनुभवी आणि उत्कृष्ट ब्राम्हण बोलवले होते. त्यांची रूपरेषा नियोजित आणि कडक होती. गावच्या प्रतेक ग्रामस्थांचा या कार्यात सहभाग लाभेल याची काळजी त्यांच्या विधिंमध्ये घेतली गेली होती.  24 तारखेला मंदिरामध्ये सर्वांना थोडे थोडे तांदूळ जमा करायला सांगितले होते. त्या तांदळात मूर्ती ठेवणार होते. मग 26 तारखेला जलादीविधी पुरुषांकडून नदीवरून पाणी आणून त्या पाण्याने सर्व ग्रामस्थ, स्त्री, पुरुष, लहान मुले सर्व मूर्तींना अभिषेक घालणार होते.  27तारखेला स्त्रिया नदीवरून पाणी आणणार आणि त्याने शतकलश पूजन विधी झाला. असो यावर सविस्तर नंतर लिहू आता मिरवणूक दिवसावर येऊ. 
24 डिसेंबरला रात्री तिन्ही मंदिरे साफसफाई, पाटीपासून झेंडे लावणे, मिरवणुकीचे सामान जमवणे, जेवणाची व्यवस्था करणे याची लगबग सुरू झाली. 25 ला सकाळी गावातील सर्व रस्ते रांगोळ्यांनी सजले. दारोदारी गुड्या उभारल्या गेल्या. रस्ते पाण्याने धुतले आणि सारवले. मिरवणुकीची गाडी आली, सर्व पुरुष सफेद कुर्ता-पायजमा आणि महिला एकाच रंगाची साडी नेसून तयार झाल्या. तुळशीवृंदावन आणि कलश घेऊन स्त्रिया आणि ढोल ताशे घेऊन 11 वाजता ग्रामस्थ करहर कडे रवाना होऊ लागले. ज्याला जमेल तसे सर्व करहरकडे पोहचत होते. प्रत्येकाला देवाची ओढ लागली होती. 
करहर मध्ये यात्रेचे स्वरूप आले होते. बामणोली गावचे तरुण मुलामुलींचे लेझिम पथक ठेका धरू लागले. सोबत रवी शिंदे ने ढोल बांधून ढोलाच्या रश्या आवळायला सुरवात केली झांज तिचा नाद घुमऊ लागली. रस्त्यावर 15 बैल जोड्या मागोमाग उभे करण्याची कसरत बैलवाले करत होते. रामवाडी चे सुनील सनस सर्वांना विठ्ठल टिळा लावत होते. महिला तुळशी वृंदावन आणि कलश डोक्यावर घेऊन, पदर डोक्यावर ठेवत लेझिम डाव बघू लागल्या, बंडा कॅमर्यात फोटो क्लिक करून आठवणी तयार करू लागला. यात कधी तास गेला समजलं नाही आणि आणि ठीक दिडला करहर च्या कमानीतून मूर्ती घेऊन रथ खाली येऊ लागला. ते दृश्य बघून एकच आवाज घुमू लगला..चांगभलं बोला....चांगभलं... काळ भैरवनाथाच्या नावाने चांगभलं... प्रतेकाची नजर त्या भैरवनाथ आणि जोगाई देवीला बघायला असुसली होती. रथ मुख्य बाजारात आला मग त्यापुढे 15 बैलजोड्या, 2 घोडी, त्यपुढे पुरुष भाविक त्या पुढे महिला, आणि सर्वांच्या पुढे भजनी मंडळ असा 500 मीटर ची पारंपरिक पायी मिरवणूक पुढे निघाली. चांगभलं चा घोष, फोटो काढत, traffic control करत करत 3 तासात करहर ते महू हे 3 किमी अंतर भक्तिमय वातावरणात पूर्ण झाले. पिंपळी फाट्यावर स्थानिकांनी पाणी व्यवस्था केली होती. वातावरण इतकं भक्तिमय आणि आनंदी होत की कोणताही अडथळा न येता मिरवणूक थाटामाटात पार पडली. 
गावात जशी मिरवणूक आली तस मंदिर परिसर चांगभलं घोषणांनी दुमदुमला.. सर्व विधी पूर्ण करत योग्य वेळेत ब्राम्हण काकानी काळभैरव, जोगाई माता, गणपती आणि हनुमान च्या मूर्ती सर्व गावाने जमवलेल्या तांदळात ठेवल्या. प्रत्येकजण या कामात आपला कसा हातभार लागेल यासाठी प्रयत्न करत होते. 
 यानंतर रात्री गावची भली मोठी पंगत बसली. दिवसभर नाचून सर्व थकले होते आणि खूप भूक लागली होती. महिला आणि लहान मुलांनी भली मोठी खाल इजची आळी ते वरची आळी पंगत बसवली आणि जेवण कधी संपले कोणाला समजलेच नाही. मग परत भात आणि झुणका बनवून सर्व राहिलेलं भाविक आनंदात जेवले आणि पहिला दिवसाचा सोहळा पार पडला. जेवताना मी दुसरा दिवस कसा असेल याची कल्पना सर्वांना देत होतो. 
सर्वजण दुसऱ्या दिवसाच्या प्रतीक्षेत घरी गेले. प्रमुख कार्यकर्ते दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यात गुंतले. 
आता उत्सुकता दुसऱ्या दिवसाची...
आज वीणा घेऊंन झाला आणि या आठवणी उतरवल्या.. लवकरच पुढील 2 दिवस क्रमशः येतील.. हे लिखाण कसं वाटलं नक्की सांगा.. आणि अजून काही आठवणी असतील तर कळवा. सोबत पूर्ण मिरवणुकीचा एक व्हिडिओ लिंक देत आहे. 
https://youtu.be/BElAcC7YHjQ?feature=shared

आपलाच
जयंत जगताप. 

 



Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)