*मंदिर उद्घाटन सोहळा दिवस दुसरा - सप्तनद्या जल आणि शाही स्नान सोहळा*
*काळभैरव मंदिर उद्घाटन सोहळा दिवस दुसरा - सप्तनद्या जल आणि शाही स्नान सोहळा*
सध्या आपण सर्व जण एक सुवर्ण काळ जगत आहोत. कालच म्हणजे 18 तारखेला गुरुवारी अयोध्या मध्ये श्रीरामाच्या मूर्तींना 101 नद्यांच्या जल, तसेच विविध प्रकारच्या दिव्य वस्तू नी शाही स्नान घालून गर्भ ग्रहात घेऊन गेले. असच भव्य दिव्य सोहळा आमच्या महू गावात पार पडला. 25 ते 27 डिसेंबरला आम्ही तो अनुभवला आणि आम्हाला त्याचा भाग बनायचे भाग्य लाभले. आपली संस्कृती कशी आहे हे आयुष्यभर ऐकत आलो पण त्या तीन दिवसात जे करायला लाभलं ते अद्वितीय होत. आपली संस्कृती जगत होतो.
पहील्यादिवशी भव्यदिव्य मिरवणूक पार पडली आणि सर्व गाव भक्ती सगरात बुडाला. गावात फक आनंद, प्रसन्न वातावरण होत. सोबतीला कडक थंडी होती, झुळू झळू येणारी थंड हवा आणि मनाला ऊब देणारी भैरवनाथाच्या आगमनाची ओढ होती. त्या ओढीत कधी पहाट झाली समजलं नाही. ठरल्याप्रमाणे सर्व जण स्नान करून, धोतर नेसून आणि सफेद वस्त्र घालून सोबत घागर, हंडा किंवा कलश घेऊन गावातील सर्व भावकितील ठराविक असे भक्त मंदिरासमोर जमले. सकाळी सकाळी नग्न पायांनी नदीवर जायचे आणि जल आणायचे आणि मंदिरासमोरील मोठ्या 2 जल पात्रात साठवायचे. सर्वांनी अतिशय भक्तीभावात आनंदात एकमेकांना हसवत, पायाला टोचनारे थंडगार खडे चुकवत सकाळच्या अद्भुत वातावरणात नदीकडे प्रस्थान केले. विजय जगताप या विधीचे महत्व ओळखून आमचे सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ काढायला आमच्या सोबत आला होता. सर्वजण एकमग्न होऊन हा विधी पार पाडत होते. कोणाच्याहि मनात हेवेदावे, क्रोध, मत्सर येत नव्हता, कदाचित हाच या विधी करायचा सार असेल. फक्त एकच आवाज शिवारात घुमत होता तो म्हणजे *चांगभलं बोला.. चांगभलं.. ..* नदीवर हात पाय धुतले डोक्यावर पाणी शिंपडले. गार पाणी अंगाला टोचत होते पण काही त्रास होत नव्हता. एक दोन जणांनी तर चक्क तसच धोतर आणि बनियान वर डुबकी मारली आणि तरीही काहीही त्रास झाला नाही हे होत भक्तिमय वातावरण. सर्वांनी जल घेतले आणि पाटीकडून मुख्य रस्त्याने गावात आणून 2 पातेल्यात साठवले. विविध नद्यांचे जल, विविध वनस्पती, झाडे, सुगंधी द्रव्य मग त्यात मिसळले गेले. मग सर्व चारही मूर्ती जल्लोषात मंदिरासमोरिल मंडपात आणून मोठ्या पातेल्यात ठेवल्या. हळू हळू सर्व ग्रामस्थ महिला, पुरुष, पाहुणे लहान मूल जमू लागलीत आणि शाही स्नान प्रारंभ झाले. भटांनी विविध मंत्र घोष पठण चालू केले. पाच भट एकमेकांना साथ देत संस्कृत मंत्र मोठ्याने बोलत होते आणि वातावरण मंत्रमुग्ध करत होते. मंदिरपरिसर गर्दी ने भरला होता पण कसली ही घाई गडबड गोंधळ जाणवत नव्हता. होती ती फक्त देवावर आपल्या हाताने जल घालायची ओढ. मंत्रघोष झाले की मुख्य जो तरुण भट स्वामी होता त्यांनी स्नान विधी चालू केला. प्रत्येकजण रांगेत येऊन, पवित्र जल घेऊन मूर्तींना स्नान घालत होते. स्त्रियांना तर जो आनंद होत होता तो द्विगुणित होता कारण यानंतर त्यांना परत देवाला हात लावता येणार नव्हता. त्यामुळे त्या मनभरून स्नान घालत होत्या आणि देवाला निरखत होत्या. दही, मध, माती, विविध वनस्पती, चंदन, तूप, दुध अशा अनेक प्रकारच्या गोष्टीनी स्नान पार पडले. आता मूर्तीना पुसून जयघोष करत मुख्य मंदिरात नेऊन गादीवर झोपवण्यात आले. आता देवाचा आरामाचा वेळ होता. गावात कोणीही कसलाही मोठा आवाज करायचा नाही हे सांगितले गेले. सर्वजण भक्तिमय होऊन दिवसभर मंदिराकडे ये-जा करत होते. संध्याकाळी सर्व ग्रामस्थ जमून महाआरती करण्यात आली आणि देवाने डोळे उघडले...
दुसरा दिवस पूर्ण होत आला आणि सर्वजण तिसऱ्या दिवसाकडे डोळे लावून बसले. ज्या भावकिवर जबाबदारी होती ते आणि इतर भावकितील काही ठराविक जबाबदार कार्यकर्ते तिसऱ्या दिवसाच्या तयारीत गुंग झाले.
भक्तिमय वातावरणात गाव डोलत होता.. एक अद्भुत सोहळा पार पडत होता.. पडत होता.
https://youtu.be/SDMRv9WU5cQ?si=Z4sf_Ni_c8Rc2wsC
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment