शिवा काशिद
माश्या घोंगाव्या तसा आवाज पसरला होता...रात्रीचा वख्त त्यात पोटात भुकेचं दुखणं वेगळं...
सहाशे बांदलांच्या पायाला मात्र थांबायला शब्द नाही.... मागं कोणी पालटुन पाहलं एक रिकामी पालखी मागं पडली....
आन पुढती शिवाजी राजे अनवाणी पायांनी चलायला लागले...
तरी मागं हाक यायची....
" पालखी आहे का कुठली ??? कोणी दिसतय काय ??? "
नाही जी......
डोळे फक्त शिवाजी महाराज बनुन गेलेल्या शिवा काशीदा साठी मागे पालटत होते पण पालखी तर न्हाय दिन दिन आवाज जोर्यानं ऐकू आला...
आणि कळालं समद्यांना शिवा काशीद बलिदान देऊन स्वर्गी गेले आन हे नरकवासी आदिलशाही फौज शिवाजी राजांना संपवण्यासाठी पुढे येत होती....
रातभर चाललेलं मराठा सैन्य जागीच थांबलं , सर्व संपलच जणू पण स्वतःच्या नावाला स्वराज्याच्या स्वर्ग कागदावर लिहण्यासाठी..
आसुसलेली ही माणसं राजापुढे झुकुन बसली.....
" राजं....हितुन म्होरं निघा , .....!! "
व्हय व्हय राजं जावा आन विशालगड गाठा.... आम्ही गनीम कापून रणचंडिकेला आवतण घालतो... !! "
बाजीप्रभू देशपांडेनी शब्द टाकला ...
"गडावर पहोचताच तोफांना पाच बार द्या.... आम्ही जीव देऊ पण तुमचा जीव जाऊ देणार नाही....."
शिवाजी राजेंच्या डोळ्यांत पाणी उमटलं... मागे बघून सर्वांना हात जोडून पुढे निघाले.....
एक राजा आपल्या सैन्याला आदराने हात जोडत काळाने पहिल्यांदाच बघितलं...
बाजीप्रभू, फुलाजी आणि बांदल स्वतः शीच बोलायला लागले
"त्यो बघा .....आमच्या सारख्या सामान्य माणसाला मोठा करून भला मोठा माणूस महाराष्ट्रधर्म राखायला निघाला.... !! "
बाजी ह्या शिवभारतात शिकायचं काय??
' आपली माणसं मोठी करायला......!!! "
कैसे....
" जर हा शिवाजी राजा नसता तर आमचं नाव तरी कुठं असतं?? ह्यो राजा म्हणजे भाग्यविधाता..."
✍🏻अक्षय चंदेल©
Comments
Post a Comment