राधिका निकम
*एक अफलातून जीवनप्रवास -राधिकाताई निकम*
गेले पाच दिवस आपण सर्वजण प्रवचन म्हणून सुंदर अस रामायण ऐकत आहोत. दिवसभरात महाभारतात श्रीकृष्ण यांनी सांगीतलेली गीता आणि सायंकाळी रामायणातील बालकांड, सुंदरकांड, अरण्यकांड, हनुमान भगवंताची कथा असे रामायण ऐकत आहोत.
हे रामायण ज्यांच्या मुखातून ऐकत आहोत त्या *डॉक्टर राधिका निकम* यांचा एवढा गाढा अभ्यास बघून, त्या सांगत असलेल रामायण ऐकत सर्व भाविक मंत्रमुग्ध होते आहेत. उत्सुकता म्हणून या रामायण सांगणाऱ्या ताई कोण ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि जी माहिती समजली ती ऐकून माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. आपले गावचे जेष्ठ समाजसेवक दिलीप दादा (स्वामी) यांच्या त्या मावस बहीण. आणि त्यांचे माहेर पिंपळी, मेंगडे घर म्हणजे पिंपळी आणि महूच्या सीमेवर असलेल शेतकरी कुटुंबच घर. वडील मुक-बधीर शेतकरी, आई साधी भोळी शेतात काम करणारी. लहानपणापासून आई वडिलांसोबत शेतात राबणारी लेक. वेळ प्रसंगी शेतात औत चलवणरी राजमताजिजाऊची लेक म्हणजे *राधिका*. आई वडिलांनी शेतात काबड कष्ट करत करत मुलांना वाढवले. कसेतरी शिक्षण पूर्ण झाले आणि लवकर लग्न लाऊन दिले. हरहुन्नरी स्वभाव असणाऱ्या राधिका मेंगडे आता राधिका निकम झाल्या. करंदी गावात सून म्हणून गेलेल्या राधिका ताई चा संसार फुलू लागला होता. 1 मुलगी आणि 2 मुले असा संसार फुलत असताना. काळाची नजर लागली आणि काहीतरी अघटीत घटले आणि राधिका ताईच्या पतीचे अकाली निधन झाले. क्षणात होत्याचं नव्हत झालं. संसाराचा वेलं ज्या आधारावर वाढत होता तोच हरपला होता. पण राधिका ताई शेतकऱ्याच्या खळ्यात तयार झालेलं रसायन होत, सर्व दुःख पचवल आणि सुरू केला नियतीशी लढण्याचा खेळ.
नातेवाईक आधार देत होतेच, सोबत स्वतच्या जिद्दीवर 3 मुलांना मोठ करत करत त्यांनी निसर्गोपचार पद्धतीत डॉक्टरी मिळवली. स्वतः डॉक्टर झाल्या. नाशिक शहरात स्वतचं क्लिनिक सुरू केलं. मुलांचं उच्च शिक्षण पूर्ण केलं. यासोबत अध्यत्म करत करत संपूर्ण रामायण कधी पाठ झालं हे त्यांनाही समजलं नाही. हळूहळू प्रवचन करत आता त्या संपूर्ण रामायण कथा रुपात सांगतात.
गेल्यावर्षी 2024 मध्ये आमच्या गावात पारायण मध्ये 7 दिवस त्यांनी सुंदर अस रामायण सांगितलं आणि सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्यांचा जीवनप्रवास ऐकून मी भारावून गेलो आणि त्यांचा हा प्रवास कागदावर उतरवला पाहिजे असं वाटलं.
रधिकाताई तुमच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा..
लेखक : जयंत जगताप
Comments
Post a Comment