कर्तव्य जबाबदारी आणि अधिकार
*कर्तव्य, जबाबदारी आणि अधिकार*
आपण सर्वजण सीमेवरील ताणतणाव आणि देशसेवा बजावणाऱ्या सैनिकाबद्दल नेहमीच ऐकत असतो, तेथील फोटो , व्हिडिओ प्रसारमाध्यमामध्ये नेहमी येत असतात. ते बघून अनेकांना वाटते अस लढल पाहिजे, तस केलं पाहिजे. मग कधीतरी एखादा पर्यटक सीमेवर जातो आणि तेथील जवानांना अक्कल शिकवायचा प्रयत्न करतो, बंदूक सांभाळायचा खर्च किती ते विचारतो, जवान त्याला सर्व सांगतो, त्याचा maintenance असतो. ते सांगतो, हे ऐकून तो पर्यटक लालबुंद होतो आणि वायफळ बडबड सुरू करतो " अरे तुम्हाला समजत का आम्ही टॅक्स भरतो आणि तुम्ही इतका खर्च करता, तुम्हाला काही अक्कल नाही, मी बंदुकीच्या कारखान्यात काम करतो, तिला इतका खर्च येत नाही, आम्ही तर अर्ध्या किमतीत बनवतो, मला माहित आहे बंदूक कशी चालवायची ते, ती द्या इकडे. मी चालवतो". अस बोलून तो त्या सैनिकाची बंदूक खेचू लागतो. जवान त्याला समजवायचा प्रयत्न करतो पण तो अतिशहाणा पर्यटक बेफान झालेला असतो, इतक्या वेळ शांततेत त्या पर्यटकाची वायफळ बडबड ऐकून घेणारा जवान आता भडकतो, कारण कोणत्याही जवानाला त्याची बंदूक जिवापेक्षा प्रिय असते. जवान त्या पर्यटकाच्या कानशिलात एक लगावतो, त्याच्यकडून बंदूक सोडवून घेतो आणि त्याची कॉलर पकडुन त्याला सांगू लागतो, देशबांधवा, जरी तू बंदूक बनवत असलास तरी ती चालवायचा अधिकार तुला नाही, कारण त्यासाठी अगोदर इथे सीमेवर *कर्तव्य* बजवाव लागत, त्यातून येते *जबाबदारी* ती आपल्या देशाच्या रक्षणाची. आणि हे करताना जर कोणी शत्रू अंगावर आला तर त्यावर गोळी झडण्याचा *अधिकार* भेटतो. तो शेवटी येतो, आधी कर्तव्य येते. आणि राहिला प्रश्न खर्चाचा तर देश टिकवण्यासाठी तो करवाच लागतो, तुम्हाला सुरक्षा हवी तर तो करावाच लागणार, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहता, आपली काम करत वेळ घालवता, आम्ही सीमेवर कुटुंबापासून दूर असतो ते तुमच्यासाठी, त्यामुळे ही खर्चाची वायफळ बडबड बंद कर आणि आणि थोड डोकं वापर. एवढं सांगून जवान त्याला तिथून जायला सांगतो पण मनातून त्याला दुःख झालेले असत की अशीही माणसं आपल्या देशात आहेत.
अशीच मूर्ख आणि अतिशहाणे माणसे आपल्या समाजात असतात, ती कोणत्याही सामाजिक कार्यात पुढे लागून कार्य करत नाहीत, आपला वेळ देत नाहीत, थोडीशी आर्थिक देणगी देतात, तीही जबरदस्ती समाजाला घाबरून देतात परंतू आव असा आणतात की यांना त्या कार्यातील सर्व समजते, सामाजिक कार्य सुरू असताना ही गायब असतात, स्वतच्या दुनियेत गुंग असतात, अगदी त्या कार्याच्या जवळ गेले तरी तिकडे ढुंकून बघत नाहीत. परंतू शेवटी जेव्हा कार्य पूर्ण होते तेव्हा यांना यांचा शहनपणाचा डंका मिरवयाचा असतो. त्या पर्यटक सारखे बेछूट आरोप करत बसतात. सामजिक कार्याला आपलं कर्तव्य समजून, जबाबदारी अंगावर घेऊन, स्वतचं वेळ मोडून, वेळप्रसंगी अनेकांचं मनधरणी करून, कैकवेळेला इतरांपेक्षा किंचित का होईना अधिक आर्थिक सहकार्य करून जवानांसारखे खंबीर उभे राहतात आणि सामजिक कार्य अधिकाराने पार पाडतात. आणि जेव्हा यांच्यावर असे बिनबुडाचे आरोप होतात तेव्हा ते आतून दुखावतात. सर्व करूनही अशा परिस्थितीला सामोरे जातात तेव्हा पुन्हा कधी अशा कार्यात सहभागी होणारे जवान कमी होतात.
म्हणून प्रत्येकाने आपली कर्तव्य ओळखावी, मग जबाबदारी अंगावर घ्यावी मग नक्कीच आपल्याला योग्य तो अधिकार प्राप्त होतो. तरच आपला गाव, राज्य आणि देश सुजलाम सुफलाम होईल.
धन्यवाद
जयंत जगताप.
Comments
Post a Comment