झांजा शिवाजी गोळे
झांजा शिवाजी गोळे
पश्चिम महाराष्ट्रात यात्रा म्हटले की देवाचा छबीना हा एक अतिशय महत्वाचा असा कार्यक्रमाचा भाग. ताज्या यात्रेच्या रात्री भागातील 100 ते 150 ढोल वादक गावात येऊन मंदिरासमोर एक स्वरमय अशा ठेक्यात ढोलवादन करतात त्याला छबीना असे म्हटले जाते. या छबिन्याला लयबद्ध करण्याची, सर्व ढोलक्यांना एक तालावर घेऊन यायचं आणि मग कधी वर कधी खाली ठेके घेऊन रुमाली बसवायची याची जबाबदारी असते ती झांजा वर.
दोन हातात झांज घेऊन योग्य असा दाब देत आवाज वर खाली करत जागेवर गिरकी घेत योग्य असा ठेका घ्यायला लावत भागात एक उत्तम असा झांजा म्हणून लावलौकिक मिळविले पानस गावचे सुपुत्र झांजा शिवाजी गोळे.
लहानपणी अनेक ढोलक्या म्हणून ढोल घेत अनेक गावे फिरले शिवाजीदादा तरुणाईत काही वर्षे मुंबईत कामधंदा करायला गेले, पण तिथे मन रमले नाही. 1993 ला पुन्हा गावी येत शेती आणि गाई म्हशी सांभाळत आपला वारकरी सेवेत रमू लागले. न चुकता वारी करणारे वारकरी शेती करून वेळ मिळू लागला तसे पुन्हा ढोल घेऊन गावोगावी छबीने गाजवू लागले. कालांतराने गुढग्याचे दुखणे वाढले आणि ढोल वाजवणे अवघड होऊ लागले. पण म्हणतानाना ज्याला एखाद्या कलेची आवड असते तो त्यात काही न काही मार्ग शोधतच असतो. त्यातूनच ढोल सोडून शिवा दादानी झांज हातात घेतली आणि रुमाली शिकली, कतरी शिकली. रुमाली म्हणजे छबीन्याच चाल आणि कतरी म्हणजे छबिन्याचा शेवट करायची पद्धत असते.
तर शिवा दादानी यात अशी काही महारात मिळवली की कितीही ढोलके असले तरी शिवदादा 5 मिनिटांत त्यांना एक ठेक्यात आणतात. असच एकदा खिंगर च्या यात्रेत 280 ढोलके जमले होते. झांजे म्हणून पसरणीचे एक दादा आणि आपले शिवादादा उपस्थिती होते. अगोदर पसरणीचे झांजे रुमाली बसवत होते पण त्यांना सर्वांना एक ठेका काही जमत नव्हता. ग्रामस्थ माईक वर सांगून दमले की एक ठेका घ्या पण यश काही येत नव्हते, शेवटी कोणीतरी सांगितले शिवादादाना पाचारण करा.
शिवादादानी एक टेबल द्यायला सांगितले. त्यावर उभे झांज हातात घेत योग्य तो आवाज आणि दाब काढून स्वतःचे कसब दाखवत 5 मिनिटांत सर्व ढोलक्यांना एक लयीत आणले.
बरं हे करत करत शिवदादा आपली वारी कधी चुकवत नसत, त्याचेच फळ म्हणजे त्यांना लॉकडाउन मधे नवीन संधी भेटली. Lockdown मूळे गावात बाहेरील कोणाला प्रवेश नव्हता, दिंडी पारायण सोहळा साजरा करायचा होता, मग ठरले गावातीलच वारकरी लोक प्रवचन आणि किर्तन सांगतील, शिवदादानी या संधीचे सोने केले आणि उत्कृष्ट असे कीर्तन व पारायण सांगितले. आज जवळ जवळ 10-12 कार्यक्रम त्यांचे भागात झाले आहेत. बरं हे पारायण म्हणजे ते सेवा करतात. त्यातून मिळणारे मानधन ते प्रपंचात कधीच वापरत नाहीत तर ते वारीत दान करतात.
तसेच आपली परंपरा पुढे चालावी म्हणून नवीन ढोलके आणि झांजे देखील ते तयार करत आहेत.
महूच्या यात्रेत यांचे झांज वादन बघून त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होती ती आज योगायोगाने पूर्ण झाली आणि त्यांच्याबद्दल अशी प्रेरणादायी माहिती समजली.
लेखक जयंत जगताप महू
Comments
Post a Comment