कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा
*कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा*..
आमच्या गावाकडे पूर्वी अनेक लाकडी आडाची घर असायची. त्या घरात वाटीवर जो माळा असायचा तो लाकडी फळ्यांचा असायचा. 5 फुटांचा 1 खण, प्रत्येक खनावर एक लाकडी खांब, खांब खालून सडू नये म्हणून त्याखाली 1sq फुटाचा चौकोनी दगड आणि त्यावर 6 फूट उंच खांब. मग त्यावर आडवे खांब. त्यांची लांबी साधारण 10फूट असायची. त्या आडव्या खांबावर व्यवस्थित फळ्या ठोकून माळा तयार व्हायचा. त्या आडव्या खांबावर सुविचार लिहलेले असायचे. असच 14 खनाचं लांबच्या लांब अस माझ्या मावशीचे घर आहे त्यावर त्यातील खांबावर लिहिलेले सुविचार लहानपणी आम्ही अनेकदा वाचायचो आणि पाठ करायचो. त्यातील अनेक सुविचारपैकी लक्षात राहिलेला सुविचार म्हणजे, "कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा"..
आज आपण यातील दिलदार शत्रू याविषयावर बोलणार आहे.
आजकाल जी युद्ध चालू आहेत रशिया-युक्रेन, इस्रायल - हमास किंवा इराण, आणि गेली 75 वर्ष सुरू असलेलं भारत - पाकिस्तान. अशाच लढाया देशांतर्गत, राजकारणात, समाजकारणात, धर्मधर्मात सुरू असतात.
यात सहसा दोन प्रकारचे शत्रू असतात, एक ज्यांना जिंकायचं आहे आणि काहीतरी मिळवायचं आहे. आणि दुसरे ज्यांना जिंकण हरणे महत्वाच नाही फक्त आपल्या शत्रूला पुढे जाऊ द्यायचं नाही, स्वतः प्रगती करायची नाही, काही विधायक कार्य करायचे नाही आणि शत्रूला देखील काही प्रगती करून द्यायची नाही. त्यांना फक्त लढत ठेवायचे. कारण त्यांना दुसरे काही काम नसते. जुन्या कुरापती, एकच विषय ताणत ठेवायचा आणि शत्रुची कोंडी करायची. पाकिस्तान हा असा कपटी शत्रू आहे जो भारताला लाभला आहे. काश्मीर प्रश्न त्यांना मिटवायचा नाही आहे तो तेवत ठेऊन जगातून मदत मिळवत राहायची आहे.
असेच देशांतर्गत धार्मिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांत देखील असे शत्रू असतात ज्यांना फक्त विरोध करून स्वतःचे पोट भरायचे असते. अशा शत्रूमुळे संपूर्ण समाजाचे नुकसान होत असते. त्यांना काही दिशा नसते त्यांना फक्त विरोध करणे हेच त्यांचे ध्येय असते. यातून अनेक विधायक कार्य मागे पडतात, एक होतकरू पिढी नष्ट होत असते. म्हणून विरोध करा पण विचारपूर्वक करा.
शेवटी एक सांगेन, शत्रू बनायचे असेल तर त्यात देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला पाहिजे. कारण जेव्हा महाराज इहलोकीची यात्रा संपवून परत गेले तेव्हा त्यांचा शत्रू औरंगजेब सुद्धा हळहळला की असा महान, दिलदार शत्रू आता परत मिळणार नाही.
म्हणून म्हणतात *कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा*..
Comments
Post a Comment