देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे
देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे - प्रबोधनकार ठाकरे
पुस्तक अभिप्राय
अगदी छोटेसे फक्त 24 पानी वैचारिक पुस्तक.. पुस्तकाचा गाभा आहे हिंदू धर्माची मंदिरे आणि त्यामुळे लोकांमध्ये पसरलेली विषमता.. अतिशय जहाल अशी मते प्रबोधनकार ठाकरेंनी मांडली आहेत. पहिली 22 पाने वाचताना तर मनाला खूप काबूत ठेवावे लागते. जो आजचा कट्टर हिंदू असेल त्याला तर हे पुस्तक म्हणजे प्रत्येक पान हे कडू लिंबाचा घोटासारखे वाटेल. भटांनी कशाप्रकारे देवांचा बाजार मांडला आहे आणि कशाप्रकारे बहुजन समाजाला मंदिर प्रवेश रोखला आहे त्यामुळे हिंदू धर्मात कशाप्रकारे अनागोंदी माजली आहे आणि परधर्मीय आपल्या धर्मावर हल्ले करायला का यशस्वी झाले याचे सारांश रुपात वर्णन केले आहे.
हे पुस्तक वाचन करताना लेखकाने ते कोणत्या काळात आणि कशाप्रकारच्या सामाजिक परिस्थितीमध्ये लिहिले आहे ते समजून घेणे गरजेचे आहे. मगच त्यातून आपण खरा बोध घेऊ शकतो.
22 पानांचे कडू घोट पिल्यावर शेवटी त्यावर रामबाण उपाय सांगितले आहेत. ते असे.
1. मंदिरावर बहिष्कार
2. देवाची कार्य करण्यामध्ये सर्व समावेशकता जसे की, मंदिरात आरती, सत्यनारायण पूजा, गणेश स्थापना, पौरोहित्य, अशी कामे फक्त एका जातीपुरती ठरावीक न ठेवता सर्वांनी शिकावी त्यातून सामाजिक समतोल वाढेल आणि प्रत्येकाला सामावून घेतले जाईल त्यातून एकी वाढेल.
3. सर्व मंदिरातील मूर्ती एका मोठ्या ठिकाणी ठेवून त्याचा प्रदर्शन भरवावे. आणि बाकी मंदिरे सामाजिक, शैषनिक, आरोग्य सुविधा साठी वापरावी.
यातील पहिला आणि तिसरा उपाय तर कालबाह्य वाटत आहेत. दुसरा उपाय मला योग्य वाटला आणि माझ्या विचारसरणीनुसार मी अगोदरपासून ते अमलात देखील आणला आहे. मी स्वतः घरातील आणि मित्राच्या घरातील गणपती स्थापना करतो. गावातील मांगवाड्यातील मित्रांचा गणपतीला आवर्जून जातो त्यातून आपुलकी वाढते आणि त्यांच्यातील कमीपणाची भावना नष्ट होते.
शेवटी तात्पर्य हेच की तुम्ही हिंदू म्हणून एक व्हा, जातीपातीत विभागून राहू नका अन्यथा इतर गैरफायदा घेतील ही निश्चित आहे.
आज समाजात यावर बऱ्यापैकी प्रबोधन झाले आहे. तरी अजून सर्वांनी आपल्या जातीचा फुकटचा अभिमान बाळगण्यापेक्षा धर्माचा अभिमान बाळगावा आणि धर्म आणि राष्ट्र मजबूत करावे एवढेच सांगणे.
धन्यवाद
जयंत जगताप
Comments
Post a Comment