योग्य लोकांना जपा

  *लोकांना जपा त्यांचे कार्याचे आजच कौतुक करा.* 

परवा अचानक अजित दादांची जीवनयात्रा संपली आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर प्रेम करणारे त्यांचे चाहते हळहळले. कामाचा माणूस, सतत जनतेसाठी धडपडणारा, 17-18 तास काम करणारा. सामान्य लोकांना मोठा करणारा, दिलेला शब्द पाळणारा, तोंडावर खर बोलणारा, अशी अनेक स्तुती सुमन त्यांच्यावर उधळली जात आहेत. पण खंत ही आहे की त्यांच्या या कर्तृत्वाची पोचपावती ऐकायला, बघायला ते स्वतः हयात नाहीयेत. दादा हयात असताना अनेकदा त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांकडे खंत व्यक्त केली होती की मी एवढा कामाचा माणूस मग माझ्यावरच एवढी टीका का केली जात आहे? का इतका रोष माझ्यावर. एका भाषणात तर ते उद्वेगामधे म्हणतात आता या सर्वाचा कंटाळा आला आहे. इतक करूनही लोकांना त्याची कदर नाही. आणि आज ते आपल्यात नाहीयेत तर आपल्याला त्याचं महत्व समजतंय. त्यांनी परत यावे म्हणून आपण देवाला विनवण्या करतोय.  
यातून शिकण्यासारखं आहे की आपल्या आजूबाजूला पण अशी कामाची माणसं असतात जी सर्व झोकून देऊन आपल्या समाजासाठी झटत आहेत, सामाजिक कार्यात स्वतःहून वेळ काढून ते कार्य तडीस नेत आहेत. ते पण आपल्या वयक्तिक जीवनात व्यस्त आहेत जसे इतर आहेत पण समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतोय हे जाणून ते काम करत आहेत. आणि आपण काय करतोय, त्यांच्यावर टीका, त्यांनी पुढ लागून तडीस नेलेल सामाजिक कार्य कसं चुकीच. आपल्याला स्वतःला वेळ नव्हता तेव्हा अशी माणसं वेळेत वेळ काढून सामाजिक कार्यात झटत होती ते विसरून आपण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावतो, त्यांचे काम चूक ठरवतो, त्यांना विनाकारण कायद्याच्या नोटीस पाठवतो. 
उद्या देव न करो ते आपल्यात नसले की मग आपण त्यांचे कौतुक करणारा पण आज ज्या वेदना देत आहोत त्याने ते खचले जात आहेत त्याचे काय? यावर आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. 
प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून आणि आपल्या लोकांपासून करण गरजेच आहे. इंग्रजीत म्हणतात ना "Charity begins from your home"
कारण अशी कर्तुत्त्वान माणस आपल्या घरात पण असतात. मग तो घराचा कर्ता पुरुष असो. घरातली कर्ती स्त्री, गृहिणी असो, वयस्कर मंडळी असो, घरातली मुल असो. त्यांनी केलेल्या कष्टाची, चांगल्या कामांची पोच पावती त्याना पण वेळच्या वेळी देण गरजेच आहे. आपण आपल्याच लोकाना फार गृहीत धरतो आणि मग सांगायच राहून जात. एक चुकीची भावना मनात जपतो आपण ती म्हणजे त्यात काय ते तर त्यांच कर्तव्य आहे आणि याच्या आड आपण आपलं कद्रूपण लपवत असतो. 
तर माझ्या मते ही सुरुवात घरातूनच होण आवश्यक आहे. आपल्या परिघातली ५० माणसे मग अगदी आपला ड्रायव्हर, घरातील कामवाली बाई, कचरा घेऊन् जाणारे सफाई कामगार या परिघात येतात. असा विचार करून जर प्रत्येकाने या चांगल्या सवयी जाणून बुजून अवलंबल्या ना तर खूप फरक पडेल.
त्यामुळे आपल्यातील दादा माणूस, कामाचा माणूस ओळखा, त्यांना जपा, जे आपल्याला जमत नाही ते त्यांना जमतंय तर त्यांना कौतुकाची थाप द्या. कौतुक करणे म्हणजे कमीपणा नसतो, तो आपल्या मनाचा मोठेपणा असतो.  योग्य व्यक्तीचे कौतुक करणे गरजेचे असते. टीका करणे सोपे असते पण कौतुक करायला दिलदारपण असावे लागते. असे दिलदार बणा, व्यक्त व्हा, तोंडावर बोला, फोन करा, नाहीतर लिहून मोकळे व्हा, कारण टेक्नॉलॉजी आपल्या सर्वांना व्यक्त होता यावे यासाठीच बनत आहे. 
धन्यवाद
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)